कोल्हापूर - जुन्या परंपरा आणि चालीरिती जपले पाहिजे, असे आपण फक्त बोलतो. पण हे फक्त बोलून नाही तर त्या खऱ्या अर्थाने आपल्या कृतीतून जपल्या गेल्या पाहिजे. याच जुन्या परंपरा खऱ्या अर्थाने आज जर कुठे जपल्या जात असतील तर ते राधानगरीमध्ये. येथे आजही प्रत्येक सण साजरा करण्याची एक वेगळीच प्रथा आहे. आजही अनेक गावांसह वाड्या वस्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात सण साजरे केले जातात. या सर्वांमध्ये यांच्यासाठी महत्वाचा सण असतो तो म्हणजे शिमगा. आजही येथील लोक विविध प्रकारे आठवडाभर विविध पद्धतीने हा सण साजरा करत असतात.
शिमगा ते खेळोत्सव : दरवर्षी सगळीकडेच संक्रातीपासून ते अगदी गणपती, दिवाळीपर्यंत सर्वच सण आपण साजरे करतो. मात्र राधानगरीमध्ये अनेक गावांत आगळ्या वेगळ्या प्रकारे सण साजरे केले जातात. नुकताच असाच एक सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला तो म्हणजे शिमगा. दोन वर्षांपासून कोरोनाचे निर्बंधामुळे हा सण साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी या गावामध्ये होळी पौर्णिमेपासून सुरु झालेल्या शिमग्याचा फिवर काल परवाच्या खेळोत्सवापर्यंत सुरूच होता.
असा साजरा करतात हा सण : राधानगरीमधील अनेक गावात अनोख्या पद्धतीनेच शिमगा साजरा होतो. निलगिरीच्या झाडीचा उंच असा मनाच्या पाच हाताचा खांब उभा केला जातो. त्याच्या भोवती गोवऱ्या रचून होळी पेटवली जाते. त्याला सगळ्या गावाचा नेवैद्य दाखवला जातो आणि सुखशांतीचे गाऱ्हाणे घालून या सणाची सुरुवात होते. पुढे दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. शेवटी सगळे गाव नदीवर आंघोळीसाठी जाते आणि पुढे आठवडा दीड आठवडा विविध पद्धतीने सण सुरूच असतो. शिमग्याचा शेवट म्हणजे खेळोत्सव असतो. अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र आणून त्यांना त्यांचा मान देऊन ह्या खेळोत्सवाची सुरुवात होते. याचे विशेष असे आकर्षण म्हणजे बैलगाडीपासून बनवलेला हत्ती ज्याला इथल्या भाषेत रोंबाट म्हणतात. हे रोंबाट बघायला आजूबाजूच्या गावातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना याचे आकर्षण असते.
या शिमग्याच्या सणामध्ये लगोरी, दोर उड्या रोंबाट, लेझीम पथके तसेच दिवट्या, पौराणिक सोंगे, मांडावरील खेळे, त्यांची सोंगी भजने तसेच इतर पारंपरिक खेळ हे सगळ आपल्याला कोकणी संसंस्कृतीचे दर्शन घडवून आणतात. गुलालाची उधळण करत रात्रभर सोंगी भजनाचे कार्यक्रम होतात आणि होळी देवाला सुखशांतीसाठी पुन्हा गाऱ्हाणे घालून हा खेळोत्सव संपन्न होतो. गावातील मानकरी मंडळी रात्रभर मांडावरच असतात आणि पहाटे नदीवर अंघोळ करून आपल्या घरी जातात. अशा पद्धतीने हा आगळा वेगळा उत्सव केवळ राधानगरीमध्ये पाहायला मिळतो.
हेही वाचा - Gudipadwa 2022 : गुडीपाडव्याला नागरिकांनी सामाजिक संकल्प करावा : पंचांगकर्ते ओंकार दाते