कोल्हापूर - गेल्या 2 महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांना आता मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्ह्याध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यवसाय, दुकाने कित्येक दिवस बंद आहेत. या काळामध्ये व्यापारी वर्गाची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. मात्र, या सर्वांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यामुळे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडहिंग्लजमधील सर्व व्यापर्यांशी समरजितसिंह घाटगेंनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या कठीण काळात व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. बरेच दिवस व्यापार बंद असल्याने नव्याने पुन्हा जम बसवताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व अडचणी सोडवता याव्यात आणि शासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे घाटगे म्हणाले.
व्यवसायांची नव्याने उभारणी करणे तसेच नवीन नियमांचे पालन करत दुकाने पूर्ववत सुरू होण्याबाबत शासनापर्यंत व्यापाऱ्यांच्या मागण्या पोहोचवून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.