कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अंबाबाई मंदिरात रविवारी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडे आठ वाजता तोफेची सलामी देऊन नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर ९ वाजता घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली. घटस्थापनेचा धार्मिक विधी झाल्यानंतर अभिषेक व अन्य विधी पार पडले. उत्सव काळात देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. देवीची वेगवेगळ्या रुपात बांधली जाणारी पूजा भाविकांसाठी आकर्षण असते. देवीचे हे अनोख रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविक आतूर असते.
हे ही वाचा - तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईची त्रिपुरसुंदरी महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. शंकराचार्यांनी देवीचे स्तोत्र रचले आहेत. त्यातल्या काही स्तोत्रांमध्ये देवीचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामधूनच देवीचे आजची पूजा बांधण्यात आली असून यामध्ये देवीचे चार हात आहेत. वरच्या दोन हातांमध्ये पाशांकुश आहेत. खाली असलेल्या डाव्या हातामध्ये ऊसाचे धनुष्य आणि उजव्या हातामध्ये पाच फुलांचे बाण आहेत. देवीची सिंहासनारूढ अशी पुजा बांधण्यात आली असून सभोवती लाल रंगाची जास्वंदी आणि विविध फुलांची सजावट केली आहे.
हे ही वाचा - नवरात्रीनिमित्त 'मुंबादेवी'च्या मंदिरात आकर्षक सजावट, भक्तांनी फुलला मंदिर परिसर