कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी बद्दल केलेलं वक्तव्य वैफल्यातून केलं असल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यांच्या कालच्या वक्तव्यावरुन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाहांनी बंद खोलीत दिलेले आश्वासन खरे असावे, असेही ते यावेळी म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
तक्रार करणारा कारखानदार दाखवा, म्हणाल ती शिक्षा भोगू..
ते पुढे म्हणाले, भाजपच्या काही नेत्यांनी साखर उद्योगांबाबत काल अमित शाह यांच्याकडे तक्रारी केल्या. अमित शाह यांनी सरकारकडून साखर कारखानदावर अन्याय होत आहे, असे वक्तव्य केले. मात्र, त्यांचा हा आरोप चुकीचा आहे. भाजप सत्तेवर येणार नाही हे समजल्यामुळे त्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. सगळ्या कारखानदारांना थकहमी देण्यात आली आहे. थकहमी देताना कोणतीही गटबाजी यामध्ये करण्यात आली नाही. शाहांनी म्हटल्याप्रमाणे तक्रार करणारा एकही कारखानदार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे असेही मुश्रीफ म्हणाले.
सरकार भक्कम, पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे डिपॉझिट जप्त होईल..
ज्या कारखानदाराने तक्रारी अमित शहा यांच्याकडे केल्या असतील, त्यांना कदाचित केंद्राकडूनच पैसे हवे असतील म्हणून तक्रारी केल्या असाव्यात असा टोलादेखील मुश्रीफ यांनी लगावला. अमित शाह यांच्या कालच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत जे आश्वासन दिलं, ते खरं असावं असेदेखील मुश्रीफ म्हणाले. वारंवार वक्तव्य करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून सरकार भक्कम आहे. यापूर्वीही मी स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे धाडस कोणीही करणार नाही, जो करेल त्याचं डिपॉझिट जप्त होईल असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
हेही वाचा : नागपूर : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न