कोल्हापूर : जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज पुरवठा होत होता त्यापेक्षाही जास्त ऑक्सिजनची आता गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी ध्वजारोहणानंतर तात्काळ ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तब्बल दीडतास बैठक घेतली. शिवाय अनेक ऑक्सिजन कंपन्यांशी स्वतः पालकमंत्र्यांनी संपर्क साधून कोल्हापूरात ऑक्सिजनची गरज असून आज ऑक्सिजन पुरवठ्याबाबत विनंती केली. त्यानुसार आज पुण्याहून ऑक्सिजन टँकर कोल्हापूरात येणार असून जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजनची कोणत्याही परिस्थितीत कमतरता भासू देणार नाही -
जिल्ह्याला ऑक्सिजनची असलेली गरज पाहून पालकमंत्र्यांनी थेट पुण्यातील ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधला. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सचिव दर्जाचे नियुक्त नोडल अधिकारी, मुख्य सचिव यांच्याशीही पालकमंत्र्यांनी संपर्क साधला. ध्वजारोहण केल्यानंतर जिल्हाधिकारी कक्षात येऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुमारे दीड तास ही बैठक घेतली. शिवाय पुढची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन नियोजनाचा आढावाही घेतला. जिल्ह्याला दररोज 30 ते 34 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूरातील 'कोल्हापूर ऑक्सिजन' कंपनीतून जवळपास 25 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होतो. शिवाय बेल्लारी येथून 12 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन, व जिल्ह्यातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायुरूपात प्राणवायूचा पुरवठा सुरु आहे. मात्र आता पुढची गरज ओळखून तात्काळ ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी नियोजन लावून आज पुण्याहून टँकर मागविला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावाडकर उपस्थित होते.
हेही वाचा - जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; नागरिकांना शुभेच्छा देत केले 'हे' आवाहन