कोल्हापूर - 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धी मिळालेल्या अभिजीत बिचुकलेचा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून अभिजीतला ओळखले गेले. चेक बाऊन्स प्रकरणी २१ जून रोजी बिचुकलेला सातारा पोलिसांनी थेट बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. मात्र, आता त्याला जामीन मिळाला आहे. तसेच, त्याची कळंबा कारागृहातून सुटका देखील झाली आहे.
बिग बॉसच्या घरातून थेट अटक झाल्यानंतर बिचुकलेच्या घरातील प्रवेशाबात सांशकता होती. त्याच्यावर चेक बाऊन्स, खंडणी आणि मारहाणीचा खटला सुरू होता. त्याला या तिनही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला आहे. त्याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र, माझ्यावर असेच प्रेम करत राहा, असे तो म्हणाला.
अभिजीत बिचुकले हा बिग बॉसच्या घरातील एकंदरीत वावर, बोलणे, राहणीमान आणि काही खास मैत्रिणींशी असलेली सलगी यामुळे कायम चर्चेत राहिला. त्याचबरोबर वादग्रस्त विधान, अपशब्दांचा सतत वापर करणं, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं, यामुळेही तो चर्चेत आला होता. आता त्याला जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.