कोल्हापूर- प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे, हा वाक्यप्रचार आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र, कोल्हापुरात प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. येथील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या हातातील ४ तोळ्यांच्या बांगड्या रुग्णालयातूनच चोरीला गेल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार शिवाजी पार्कमधल्या सनराईज रुग्णालयामध्ये घडला आहे.
सखूबाई मलगोंडा कांबळे (वय ६५) यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा शीतल नेजकर यांनी त्यांना गावावरून कोल्हापूरमध्ये उपचारासाठी बोलावले होते. त्यानुसार सखूबाई या कोल्हापुरात आल्यानंतर नेजकर यांनी त्यांना त्यांच्या पारिवारिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. मात्र, सखूबाईची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ जुलैला शिवाजी पार्क येथील सनराईज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी सखूबाईंचा मृत्यू झाला.
दरम्यान, सखूबाई यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नेजकर आणि त्यांच्या पत्नीला १ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागले. क्वारंटाईन काळ संपल्यानंतर नेजकर यांनी आपल्या आई सखुबाईच्या हातातील ४ तोळ्यांच्या बांगड्या परत मिळाल्या नसल्याने रुग्णालयातील डॉक्टर कोराने यांना कळविले. डॉक्टरांनीसुद्धा आपल्या बांगड्या आमच्या रुग्णालयातून गेल्या असतील तर याबाबत चौकशी करून आपल्याला लागेल ते सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे, नेजकर यांनी लगेचच गुन्हा दाखल केला नाही. मात्र, दोन महिने होत आले तरी बांगड्या मिळाल्या नसल्याने शेवटी नेजकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा- कळंबा कारागृहातील 40 कैदी कोरोनाबाधित; एकूण 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह