कोल्हापूर - कळंबा तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे मासे पकडताना दोन तरुण सांडव्याच्या पाण्यातून वाहून जाता जाता वाचले. येथील स्थानिक तरुणांच्या प्रयत्नाने या दोघांना वाचवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव हाऊसफुल्ल झाला आहे. त्यामुळे कळंबा तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहेत. या पाण्यातून तलावातील मासेसुद्धा बाहेर येत असल्याने अनेकांनी येथे झुंबड लावली. हेच मासे पकडत असताना दोन तरुण सांडव्यातून वाहून जाता जाता वाचले आहेत. सांडव्यामध्ये असलेल्या झाडाच्या एका फांदीत हे दोघेही तरुण जाऊन अडकले.
प्रवाह जोरात असल्याने त्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी येथील स्थानिक तरुणांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यांनी या तरुणांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. हे मासे सापडत असल्याने ते पकडण्यासाठी आज सकाळपासूनच कळंबा तलावावर तरुणांची झुंबड लागली आहे. तरुणांची अशी हुल्लडबाजी बंद व्हाही म्हणून स्थानिकांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.