बदनापूर (जालना) - तालुक्यातील अकोला गावातील एका सोळा वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मोटो कार्लो कंपनी व आरएन ट्रँगल कंपनीच्या सहा जणांवर २६ ऑगस्टला बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात आरोपींना अद्याप जामीन मिळालेला नसताना पुन्हा समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने दुधना नदीच्या पात्रात केलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३ ऑक्टोबरला घडली.सत्तर फूट खोल असलेल्या या खड्ड्यात अग्निशामक दलाच्या मदतीने तरुणाचा शोध घेतला जात आहे. पांडुरंग किसान मुंढे (वय ३८) असे तरुणाचे नाव आहे.
३० जुलैला अकोला तालुका बदनापूर येथील दीपक पांडुरंग केकान या मुलाचा दुधना नदीच्या पात्रातील खड्ड्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन गिते यांनी या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या मुलाचे वडील व ग्रामस्थांनी दुधना नदी समृद्धी महामार्गासाठी खोदकाम करून मुरूम, वाळू घेऊन मोठमोठे खड्डे झालेले आहेत. हे खड्डे करणाऱ्या संबंधित गुत्तेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले होते. तसेच माजी आमदार संतोष सांबरे यांनी अकोलाचे ग्रामस्थ व भानुदास घुगे, जयप्रकाश चव्हाण,भाऊसाहेब घुगे, कैलास चव्हाण, महादू गिते, राजू थोरात आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. २६ ऑगस्टला बदनापूर पोलिसांनी या मुलाचे वडील पांडुरंग श्रीहरी केकान यांची तक्रार घेतली. यात मोटो कार्लो कंपनीचे ब्रिजेश पटेल, सीपीएम अनिल कुमार,जगदीश सिंग, आरएन ट्रँगल कंपनीचे किशोर वीरजी, भवन रंगानी, जयकृष्ण कक्कड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असता या आरोपींची अटक पूर्व जमीन मिळविण्यासाठी जालना जिल्हा सत्र नयायल्यात धाव घेतली होती. मात्र, दीपक कोल्हे यांनी सरकार पक्षाची बाजू सविस्तर मांडल्याने न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला.
या घटनेला दोन महिने उलटत नाही तर पुन्हा त्याच खड्ड्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना ३ ऑक्टोंबरला घडली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे ,शेख इब्राहिम,मनसे जिल्हा प्रमुख गजानन गीते यांनी घटनस्थळी भेट देऊन तात्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाची तुकडी घटनास्थळी पोहोचली. या तरुणांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. मृत तरुण पांडुरंग मुंढे हा शेतात जात असताना पाय घसरून खड्ड्यात पडला असल्याची माहिती समोर आली आहे.
या वेळी खड्ड्यातून मृतदेह काढण्यासाठी वाकुळणी येथील बुडी घेऊन ठाव घेणारे पथक योगेश फलके, अशोक जाधव, बाळू शेरे, नवनाथ गायके हे ऑक्सिजनची नळी घेऊन थेट खड्ड्यात खाली उतरून शोध घेत आहेत. तर अग्निशमन दलाचे कमलसिंग राजपूत, पंजाबराव देशमुख, किशोर सगट, सुरेश काळे, संतोष काळे हे ही शोध घेत आहेत.