जालना - व्यवसाय म्हटले की प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टी आल्याच, त्यासोबतच जर एक महिला जर व्यवसाय करत असेल तर तीला पुरुषांच्या तुलनेत जरा जास्तच आव्हानांचा सामना करावा लागतो, मात्र या सर्व आव्हानांचा सामना करत आपल्या व्यवसायामध्ये जालन्याच्या प्रिती वैभव पत्की यांनी गरुडझेप घेतली आहे. जाणून घेऊयात त्यांचा थक्क करणारा प्रवास
हातगाडीवर भेळ, पाणीपुरी विकणे हा तसा किरकोळ व्यवसाय मानला जातो, मात्र या व्यवसायाला जर मेहनत, जिद्द, प्रामाणीकपणा आणि कल्पकतेची जोड दिली तर तुम्ही या साध्या व्यवसायातून दिवसाला तब्बल 2 हजारांचा नफा कमावू शकता, हे दाखवून दिले आहे जालन्याच्या भेळपुरी व्यवसायिक प्रिती पत्की यांनी. प्रिती यांचे 2008 साली जालन्यातील वैभव विजय पत्की यांच्याशी लग्न झाले, दोन्हीकडची परिस्थिती तशी साधारणच होती. प्रिती यांचे पंती वैभव हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत, तर सासरे विजय पत्की हे भेळपुरीचा व्यवसाय करतात, ते जालन्यातील मोतीबाग परिसरामध्ये आपला भेळपुरीचा गाडा लावतात. दरम्यान व्यवसायामध्ये वाढत असलेली स्पर्धा, सासऱ्यांचे वाढते वय यामुळे त्यांना काम करणे शक्य होत नव्हते, अखेर प्रिती यांनी या व्यवसायात उडी घेतली. पाहता पाहता प्रिती यांनी सासऱ्यांच्या मदतीने या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. प्रिती यांचे पती रिक्षा चालवतात, ते मुलांना रिक्षातून शाळेत सोडण्याचे काम करतात, मात्र सध्या शाळा सुरू नसल्यामुळे पती देखील त्यांना मदत करत आहेत. दिवसाकाठी सर्व खर्च जावून 2 हजारांच्या आसपास नफा राहत असल्याचे प्रिती यांनी सांगितले.
अशी आहे प्रीती यांची दिनचर्या
मोतीबाग परिसरात मोकळ्या जागेत हातगाडीवर हा व्यवसाय केला जातो. सायंकाळी चार वाजेनंतर जरी हा व्यवसाय सुरू होत असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र सकाळी नऊ वाजल्यापासूनच करावी लागते. सकाळी सहावाजता उठल्यानंतर प्रीती पत्की या घरचे काम आटोपून हातगाडीच्या कामाला लागतात, मोतीबाग परिसरातच एका छोट्या जागेत खाद्यपदार्थ तयार करण्याला सुरुवात होते. त्यामध्ये कचोरी, शेव, पाणीपुरी अशा प्रकारचे पदार्थ करण्यामध्ये दुपारचे बारा वाजतात. त्यानंतर घरची कामे तर चुकतच नाहीत! ती संपेपर्यंत चार वाजतात आणि वेध लागतात भेळ पुरीच्या गाड्याच्या तयारीचे. गाडा लावणे, ग्राहकांसाठी खुर्च्या टेबलची व्यवस्था करणे, आणि मग व्यवसायाची सुरुवात. रात्री नऊ वाजेपर्यंत हा व्यवसाय चालतो. घरी जायला दहा वाजतात पुन्हा तीच घरची कामे. अशा पद्धतीने घर आणि व्यवसाय सांभाळत केवळ 6 घंटे शरीराला आराम मिळतो. हातावरचे पोट असल्यामुळे सुटीचा तर विषयच नाही, आणि ज्या दिवशी शासकीय सुटी असते त्या दिवशी व्यवसाय जास्त होतो त्यामुळे काम देखील वाढलेले असते. हे करत असतानाच दोन्ही मुलांच्या संगोपनाकडे देखील लक्ष द्यावे लागते.
ग्राहकांनी कौतुक केल्याचा आनंद
सध्याच्या परिस्थितीमध्ये असा व्यवसाय करणाऱ्या तरुणांसोबत लग्न करण्यास मुली धजावत नाहीत. खरे तर त्यांनी त्यांच्या अंगात असलेली क्षमता ओळखून, अशा तरुणांसोबत लग्न करून स्वतः देखील त्या तरुणाच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. आपल्या जळव असलेल्या कौशल्याचा उपयोग व्यवसाय वाढवण्यासाठी केला पाहिजे. इथे आलेल्या ग्राहकाने पाणीपुरी, भेळपुरी, रगडा खाल्ल्यानंतर पैसे देताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्यांच्या तोंडातून निघालेले कौतुकाचे दोन शद्ब देखील आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. हेच शद्ब आम्हाला व्यवसाय करण्याचे प्रेरणा देतात अशी प्रतिक्रिया यावेळी प्रिती पत्की यांनी दिली आहे.