जालना - जिल्ह्यात मंगळवारी (21 एप्रिल) परतूर तालुक्यातील शिरोडा या गावच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 2 एप्रिलला दाढ दुखत असल्याच्या कारणामुळे विविध दवाखान्यांमध्ये प्रवास केलेल्या या महिलेला दिनांक 13 एप्रिलला जालनाच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
जालना शहरातील दुखी नगर भागातील पहिली महिला कोरोना पॉझिटिव्ह 6 एप्रिलला आढळली होती. या महिलेचा मंगळवार 21 एप्रिलला चौथा अहवाल निगेटिव्ह आला आणि जाणकारांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही बातमी सर्वत्र पसरते न पसरते तोच परत एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा संदेश सर्वत्र पसरला आणि जालनेकरांच्या आनंदात विरजण पडले.
दातदुखी ते कोरोना.. महिलेचा प्रवास -
परतूर तालुक्यात शेतामध्ये राहणारी ही महिला 2 एप्रिल रोजी दाढ दुखत होती म्हणून डॉ. सोळंके यांच्या दवाखान्यात मोटर सायकलवरून गेल्या होत्या. त्यानंतर चार तारखेला त्या घरीच होत्या पाच तारखेला ताप आणि खोकला आला म्हणून त्यांनी परतूर येथील डॉ.नवल यांच्याकडे तपासणी केली. त्यानंतर परत घरी गेल्या. 6 एप्रिल ते 8 एप्रिल ही महिला त्यांच्याघरी म्हणजे शिरोडा येथेच होत्या. 9 एप्रिलला आपल्या दिरासोबत डॉ. हुसे यांच्या जालना हॉस्पिटल येथे तपासणीसाठी आल्या आणि परत घरी गेल्या. 12 तारखेपर्यंत घरी राहिल्यानंतर 13 एप्रिलला रोजी त्या जालना येथील शासकीय रुग्णालयांमध्ये भरती झाल्या. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळात त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. एक वेळा निगेटिव्ह आलेला चाचणी काल दुसऱ्यांदा चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे.
या महिलेच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी भरती करण्यात आले आहे. ही महिला कोणाच्याही संपर्कात नसताना प्रवासाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आणि शेतात राहत असतानाही कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली? याचा तपास शासकीय यंत्रणा घेत आहे.