जालना- ओडिशा येथून जळगाव, धुळेकडे येत असलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांनी छापा मारला आहे. यात दोन कोटींचा गांजा पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परभणी जालना हद्दीवर असलेल्या मंठा पोलिसांनी काल मध्यरात्री ही धाडशी कारवाई केली आहे.
हेही वाचा- महिला अत्याचाराविरोधात अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत 'मौनव्रत' आंदोलन
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी करत असताना परराज्यातून गांजाचा एक ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने (एम एच 20 -डीई- 6777) हा ट्रक अडवून त्याची तपासणी केली. चालकाला विचारणा केली. मात्र, ट्रकचालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच ट्रक चालक संजय पन्नालाल सिंगल (रा .साळेगाव ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद) याने ट्रकमध्ये चार क्विंटल गांजा 15 गोण्यांमध्ये भरला असल्याची माहिती दिली. या गांजाची बाजारामध्ये सुमारे दोन कोटी रुपये किंमत आहे. कारवाई करण्यासाठी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विजय जाधव यांच्यासह रामचंद्र खलसे रवींद्र बीरकायलू, विलास कातकडे, शंकर रजाळे, विषाल खेडकर, आदींनी सहभाग घेतला होता. पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, पो.उपअधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पोलीस अधिक्षक एस चैतन्य यांनी मंठा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.