जालना- बदनापूर येथील एका महाविद्यालयीन युवतीने आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत त्या पैशातून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हलाखीत असलेल्या गरजवंतांना अन्नधान्य व किराणा सामानाच्या किट वाटप केले आहे. तरूणीने उपक्रम राबवून इतर तरुणांपुढे एक आदर्श उभा केला आहे. विधी व्यंकट ठक्के, असे या उपक्रम राबवणाऱ्या युवतीचे नाव असून ती सध्या 12 वीत शिक्षण घेत आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केल्यामुळे रोजच्या रोज काम करून खाणाऱ्यांवर उपासमारीचे संकट येऊन उभे ठाकलेले आहे. या परिस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर मंडळी त्यांना मदत करत आहेत. याचीच प्रेरणा घेऊन येथील विधी ठक्के या महाविद्यालयीन तरुणीने आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च या गरजवंताना अन्न धान्य किट व किराणा सामान वाटप करून एक नवा उपक्रम राबवला.
विधी ही बदनापूर येथील तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांची कन्या आहे. या किटमध्ये 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 1 लिटर गोडेतल आणि काही किराणा सामानाचा समावेश होता. तिने वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चातून 20 गरजवंतांना या किट वाटप केल्या. या आधीही ती तिचा प्रत्येक वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना जेवण देऊन साजरा करत असायची. लॉकडाऊनमध्येही या मुलींने राबवलेला हा उपक्रम तरुणांपुढे एक आदर्श उभा करून देत आहे.