जालना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वडिलांच्या नावाने 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच वर्षी या योजनेसाठी पाठवलेले प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून आहेत. दरम्यान, पुरस्कारासाठी प्रस्तावित असलेल्या सत्कारमुर्तींना या पुरस्काराची प्रतीक्षा आहे. विशेषत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'हा' पुरस्कार जाहीर होणे अपेक्षित असताना नेमके पहिल्याच वर्षी या पुरस्काराचे 'भिजतं घोंगडं' झाले आहे.
यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सावरासावर केली असून मंत्रालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे या प्रस्तावावर विचार झाला नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 17 सप्टेंबर 2019ला एक अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार राज्यात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देणे, आरोग्य विषयक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे, या उद्देशाने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध घटकांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून गौरविण्यात येणार होते. यासाठीच 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' सुरू करण्यात आला आहे. रोख रक्कम, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ही योजना प्रभावीपणे राबवून त्याला योग्य प्रसिद्धी देणाऱ्या अन्य घटकांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
'यांना' देण्यात येणार पुरस्कार -
- आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था.
- आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे तीन डॉक्टर.
- आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार.
- आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पाच कर्मचारी.
अशा एकूण दहा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सदरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविलेल्या उमेदवारांनी याचे निकाल त्वरित जाहीर करावेत, अशी मागणी केलेली आहे. खरेतर मुख्यमंत्री महोदयांच्या वडिलांच्या नावाने आणि जालन्याचे आरोग्यमंत्री असल्याने हे पुरस्कार त्वरित मार्गी लावावेत अशी मागणीही करण्यात येत आहे.
हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय उद्या; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती