जालना - सांगलीतील युवतीला अश्लील संदेश आणि संभाषण करणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर कॅफेच्या माध्यमातून हे दोघे मुलींचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क करायचे. नंदकिशोर गणेश गोल्ड आणि कृष्णा तळेकर अशी आरोपींची नावे आहेत.
कसे मिळवायचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी?
जालना शहरातील एका सायबर कॅफेमध्ये दोघे कामाला होते. काम करताना सायबर कॅफेमध्ये आलेल्या मुलामुलींचे मोबाईल नंबर आणि त्यांचे ईमेल आयडी हस्तगत करायचे. सांगलीतील मुलगी कधीही जालन्यात आली नव्हती. मात्र एक दुसऱ्याला सायबरच्या कॅफेच्या माध्यमातून संभाषण करत त्यांनी सांगलीत तिचा नंबर मिळवला. त्यानंतर तिच्याशी फोनवरून अश्लील संदेश पाठवणे आणि सतत फोन करणे अशा प्रकारचा मानसिक त्रास देणे सुरू केले. गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता या प्रकाराला वैतागून युवतीच्या भावाने जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू करून नंदकिशोर गणेश गोल्ड आणि कृष्णा तळेकर दोघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - मालगुंडच्या समुद्रात तीन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू
दरम्यान मोबाईलवरुन मुलींना जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर त्यांची नावे पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे.
हेही वाचा - राज्यात भाजीपाला प्रक्रिया उद्योग उभे राहिले तरच भाव स्थिर राहतील - संदीप जगताप