जालना - कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकत्र येण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना सूचना मिळणेही कठीण झाले आहे. ही अडचण लक्षात घेत, औरंगाबाद येथील विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 'झूम अॅप'द्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांना झूम अॅपद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण, उपचार याबाबत या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 1 हजार 452 आशा कार्यकर्त्या, 1 हजार 800 अंगणवाडी कार्यकर्त्या, 500 आरोग्य विभागातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांना प्रशिक्षण हे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणाची ठरलेली वेळ संबंधित यंत्रणेला कळविली जाते. त्यावेळेस ज्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे, त्यांना पासवर्ड दिला जातो. आज (शनिवारी) जिल्ह्यातील 1 हजार 433 आरोग्य कर्मचाऱ्यांना याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे जिल्हा प्रशासनाच्या वेळेचा अपव्यय टाळला जाऊन एकाच वेळी अनेकांना आणि तेही घरबसल्या प्रशिक्षण मिळत असल्यामुळे आरोग्य विभागाचा खूप मोठा वेळ वाचत आहे.