जालना - येथील पोलीस प्रशासनातील दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणाचा विषय निकाली निघाला आहे. न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी 'ॲट्रॉसिटी'च्या प्रकरणात पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
एकूण तीन कर्मचाऱ्यांचा समावेश
व्यवहारामध्ये तडजोडी करून हे प्रकरण तीन लाख रुपयांवर पक्के झाले. या रकमेपैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना सुधीर खिरडकर यांनी सांगितलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, या कर्मचाऱ्यासोबदत विठ्ठल खारडे हा पोलीस कर्मचारीही या प्रकरणात अडकला आहे. एकूण तीन कर्मचारी या प्रकरणामध्ये अडकले आहेत.
पोलीस वर्तुळात खळबळ
या प्रकरणाने पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणात न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. २० तारखेला दुपारी एक वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून हा कट उघड केला. (दि २१) रोजी तालुका पोलीस ठाण्यामध्ये या तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.