बदनापूर(जालना)- शासनाने कोरोना महामारीमुळे आरोग्य विभागाला २४ तास सेवा बजावण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत. बदनापूर ग्रामीण रुग्णालयात मात्र वेगळेच चित्र दिसून आले. अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सोमवारी तहसीलदार संतोष बनकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता केवळ ४ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविण्यात आले असून गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेले असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी एक डाॕक्टर, एक नर्स, एक वार्डबाय आणि सुरक्षारक्षक हजर होते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये व येणाऱ्या रुग्णांना सेवा मिळावी यासाठी सर्व आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स इतर कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मात्र, बदनापूर ग्रामीण रुग्णालयात एका डॉक्टर सह तीन कर्मचारी वैद्यकीय सेवेचा गाडा हाकत असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या काळात महत्त्वपुर्ण कणा म्हणून आरोग्य विभागाला ओळखले जाते. या संकटात परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग मोठा वाटा उचलत आहे. राज्य शासनाच्या महसूल कर्मचाऱ्यांसह. पोलीस विभागाबरोबर स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी सुध्दा अहोरात्र अखंडपणे सेवा देत आहेत. मात्र, बदनापूर ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांची गैरहजर व अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी चांगलीच तांराबळ उडत असून कमालीचा ताण सहन करावा लागत आहे.
बदनापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओम ढाकणे सध्या जालना येथील कोरोना अतिदक्षता विभागात ४ एप्रिलपासून अहोरात्र सेवा देत आहेत. बदनापूर येथे उपस्थित असलेल्या डॉ. गिरीधर बोंडले यांच्यावर सर्व मदार असून सर्व काम डाॕक्टर, एक नर्स व एक वार्डबाॕय करत असल्याचे सोमवारी आढळून आले. बाह्यरुग्ण नाव नोदंणी, इनचार्ज नर्स, फार्मासिंस्ट, एक्स रे टेक्नेशिअन, कार्यालयीन अधिक्षक, लिपीक, लॕब टेक्नेशिअन, एन.सी.डी. चे दोन कर्मचारी असे मिळून एकूण १० कर्मचारी सोमवारी गैरहजर होते. यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसून सर्व वैद्यकीय कामाचा पदभार कोणाकडे आहे ते स्पष्ट झाले नाही. ग्रामीण रुग्णालयात एक डॉक्टर, एक नर्स उपस्थित असल्याने या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढून त्यांना नाहक मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागत असल्याचे समोर आले. सध्या कोरोना विषाणूच्या संंकटकाळात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाचा गाडा हाकताना डाॕक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
प्रशासकीय वैद्यकीय अधीक्षक पदभार असलेले डॉ.ओम ढाकणे हे सध्या कोविड १९ सामान्य हाॕस्पिटल जालना येथे ४ एप्रिल रोजी गेले आहेत. प्रशासकीय वैद्यकीय अधीक्षक चार्ज नावालाच असून कुठलाही ठोस निर्णय मला घेता येत नाही. मी माझ्या रुग्णांना अहोरात्र सेवा पुरवण्यासाठी सज्ज असतो. कर्मचारी नसल्यामुळे मलाच रुग्ण तपासणीसह औषधे द्यावी लागत आहेत, असे डॉ. गिरीधर बोंडले यांनी सांगितले.
बदनापूर तालुका कोरोनामुक्त आहे आणि हा तालुका कोरोनामुक्त राहण्यासाठी आरोग्य विभागाची सेवा तत्परतेने मिळणे गरजेचे आहे. सोमवारी अचानक ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता त्या ठिकाणी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविण्यात आले आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत.