जालना - राज्यात सर्वत्र टाळेबंदी उठत असताना कोचिंग क्लासेसचे टाळे मात्र उघडले नाही. ते उघडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन जालनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान -
सात जूनपासून राज्यातील टाळेबंदी उठली आहे आणि काही ठिकाणी अंशता कमी झाली आहे. जालना जिल्ह्यातील टाळेबंदी पूर्णपणे उठली आहे, मात्र खाजगी शिकवण्या अजून सुरू झालेल्या नाहीत. त्या बंद असल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड १९ च्या अटीला बांधील राहून क्लासेस चालविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बहुतांशी क्लासेस चालकांनी कोविड १९ या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्याला याचा धोका नसल्याचेही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. क्लासेस बंद असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळता येईल. असेही या निवेदनात म्हटले आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन जालनाच्या वतीने निवेदन देण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक नितीन जयस्वाल, प्राध्यापक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अनेक खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक उपस्थित होते.
हेही वाचा - जालना : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाच्या कामावरून खडाजंगी