जालना - जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे बिहारमधील कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी शुक्रवारी (२२ मे) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जालना रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीमधून जवळपास १६०० कामगार बिहारला पाठविण्याची तयारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तीन हजार बिहारी कामगार जालना जिल्ह्यात काम करत असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यापैकी अनेक कामगारांनी आतापर्यंत मिळेल त्या वाहनाने गाव गाठले. मात्र, अद्यापही काही कामगार अडकून पडले आहेत. येत्या शुक्रवारी त्यांचीही घरवापसी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या बिहारी कामगारांनी शुक्रवारीच सकाळी त्या-त्या तहसील कार्यालयात जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तहसील कार्यालयापासून शासकीय वाहनाने सर्व कामगारांना थेट जालना रेल्वे स्थानकात सोडण्यात येईल. इथं त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था आणि आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना रेल्वेने बिहारमधील दानापूर, आरा, छपरा या स्थानकात सोडण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, या कामगारांना कसल्याही प्रकारचे तिकीट आकारले जाणार नाही, तर हा सर्व खर्च राज्य शासनाने दिलेल्या निधीमधून केल्या जात असल्याचेही उपजिल्हा अधिकारी यांनी सांगितले. यापूर्वी जालना स्थानकातून उत्तर प्रदेशकडे दोन रेल्वे रवाना केल्या होत्या. आता ही तिसरी विशेष रेल्वे रवाना होणार आहे.