जालना - शहरात दुखीनगर भागामध्ये दिनांक 6 रोजी कोरोनाचा रुग्ण सापडला आणि सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या रुग्णावर उपचार केल्यानंतर रुग्णाचा 'स्वॅब' पुन्हा एकदा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला होता. मात्र, गुरुवारी (दि. 16) हा स्वॅब पुन्हा पॉझिटिव्ह आढळला आणि जालना पालिकेचे धाबे दणाणले.
नगरपालिकेच्या वतीने कालच आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार जुना जालना आणि नवीन जालना अशा दोन विभागांमध्ये पालिकेकडे असलेल्या दोन अग्निशमन बंबाच्यामार्फत सोडियम हायपोक्लोराईड या निर्जंतुक औषधाची फवारणी करण्यात येणार आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांपासून ते स्वच्छता निरीक्षकांपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना हे काम विभागून देण्यात आले आहे. आज दिनांक 17 पासून सुरू झालेली ही फवारणी शहरातील विविध भागांमध्ये 20 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही देण्यात आली आहे.