जालना - लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या कारखान्यात वितळते लोखंड अंगावर पडल्याने सहा कामगार जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी जालन्यातील औद्योगिक परिसरात घडली.
हेही वाचा - सिटी मॉल आग प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीची मागणी, सर्वच मॉलचे होणार फायर ऑडिट
वारंवार होतात अशा घटना
जालना औद्योगिक परिसरात अनेक कारखाने आहेत. त्यापैकी गजलक्ष्मी स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुरुवारी सायंकाळी 6 कामगारांच्या अंगावर वितळते लोखंड सांडले. त्यामुळे सहा कामगार जखमी झाले आहेत. या जखमी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सहा जखमींमध्ये बबलू रॉय, विनोद कुमार, पिंटू यादव , दया प्रसाद, सूरज कुमार आणि कृपाशंकर पांडे यांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयाने चंदंनझिरा पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. घडलेल्या अपघाताची माहिती घेण्यासाठी गजलक्ष्मी स्टील कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला तेव्हा कारखान्यामध्ये व्यवस्थापक नसल्याचे सांगितले.
हेही वाचा -ठेवीदारांना ६ कोटींच्यावर गंडा घालणारी फायनान्स कंपनीची टोळी गजाआड; तीन महिलांचाही समावेश