जालना - संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखी सोहळा नंतर दुसरा मोठा पालखी सोहळा म्हणजे कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी. या पालखीला ३१० वर्षांची परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातील ही पालखी खान्देश आणि विदर्भ प्रांत पादाक्रांत केल्यानंतर या पालखीचे आज दुपारी मराठवाड्यात आगमन झाले. विदर्भाची हद्द असलेल्या देऊळगाव राजा या गावानंतर पाच किलोमीटर अंतरावर जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. जालना जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीला दोन छोटे घाट पार करावे लागतात. पुढील सहा दिवस ही पालखी जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विसावा घेणार आहे.
८ जून रोजी मुक्ताईनगर येथून ही पालखी निघाली आहे. २७५ किलोमीटरचा प्रवास करून आज ती मराठवाड्यात पोहचली. ही पालखी ७५० किलोमीटरचा प्रवास ३४ दिवस करणार आहे. त्यानंतर १० जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. यादरम्यान, या पालखीचा आज कन्हैया नगर, रविवारी काजळा फाटा, सोमवारी अंबड, मंगळवारी वडीगोद्री, बुधवारी पाथरवाला असा प्रवास राहणार आहे. त्यानंतर ही पालखी बीडकडे रवाना होईल. या पालखीसोबत ६०० महिला आणि ४०० पुरुष इतके वारकरी पालखी सोबत आहेत .
या पालखी बद्दल माहिती देताना सोहळाप्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे म्हणाले की, आत्तापर्यंत ४६ ते ४७ अंश सेल्सिअस तापमान असतानाही हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. पालखीच्या मार्ग दरम्यान शहागड येथील गोदावरी ही एकमेव नदी आहे. तिथे मुक्ताईच्या स्नानाची व्यवस्था केली जाते. मात्र, अजूनपर्यंत या गोदावरीला पाणी आले नाही. परंतु, ही पालखी पोहोचेपर्यंत निश्चितच गोदावरी मध्ये पाणी येईल आणि मुक्ताईच्या स्नानाची व्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या पालखी दरम्यान बळीराजाच्या सुखासाठी, वारकऱ्यांच्या सुखासाठी देखील पांडुरंगाला साकडे घातले जाणार असल्याचेही ते म्हणाले.