बदनापूर (जालना) - तालुक्याच्या शेवटच्या टोकाला नांदखेडा नावाचे गाव आहे. या ठिकाणी बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्याच्या सीमवर असलेले देवदरी हे 14 व्या शतकातील महादेव मंदिर असून ते निसर्गाच्या कुशीत व डोंगराच्या रांगेत वसलेले आहे. श्रावण महिन्यात हिरव्यागार मखमली हिरवळीत वसलेले हे मंदिर विलोभनीय असून येथे औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी श्रावणात असते.
येथे श्रावणात विविध भंडारे व धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंदिर बंद असले तरी फुलंब्री, बदनापूर व औरंगाबाद तालुक्याच्या सीमेवर वसलेले हे मंदिर मात्र दुर्लक्षित दिसून येते. मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्यामुळे म्हणावा तसा विकास या तीर्थक्षेत्राचा झालेला दिसून येत नाही.
या मंदिराबाबत विविध आख्यायिका आहेत. या ठिकाणी राम, लक्ष्मण व सीता हे शंकराची पूजा करताना दिसून येतात. या परिसरात माता सीता या वनवास काळात वास्तव्य करत असल्याची आख्यायिका आहे. येथून जवळच लवकुंश याचे जन्मस्थळ लहूगड आहे. येथेच माता सीतेने पूजनासाठी मोठी शंकराची पिंड केली. तेथेच हे देवदरी मंदिर उदयास आले, असेही जाणकार सांगतात. या ठिकाणाला पूर्वी रामेश्वरम असे नाव होते. या ठिकाणी साधारण 14 व्या शतकातील पुरातन मंदिर आहे. मराठवाड्यात हैदराबादच्या निजामाची राजवट सुरू असताना निजामांनी सत्ता बळकट करण्यासाठी या भागात धुडगूस घातला होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार प्रतापराव जाधव यांना निजामाचा उपद्रव थांबवण्यासाठी पाठवले होते. प्रतापराव जाधव यांनी याच दरी खोर्यात वास्तव करून निजामासोबत लढत होते. याच दरम्यान येथील या जंगलात मोडकळीस आलेले हे रामेश्वरम मंदिर प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनीच 16 व्या शतकात या मंदीराचा जिर्णोद्धार केला.
आजही मारसावळी जंगल परिसरात प्रतापराव जाधव यांची समाधी मंदिर आहे. येथे देवाचे वास्तव डोंगराळ दरीत असल्यामुळे देवस्थानचे नाव रामेश्वरमवरून देवदरी असे पडले असावे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्यात निजामाच्या अधिपत्याखाली हा भाग होता. तेव्हा निजामांनी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्न केला होता. परंतु, मंदिराच्या प्रवेशद्वारात सुरुवातीलाच भारतमातेची सुबक अशी जुनी मूर्ती त्याठिकाणी होती. त्या मूर्तीला खंडीत करत मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीची तोडफोड करणार, असे असतानाच मुख्य गाभाऱ्यातून डरकाळी फोडत एक वाघीण पुढे झेपावताच निजाम सैनिकांना आपले शस्त्र सोडून पळ काढल्याचा इतिहास येथील जुने वडिलधारे आजही सांगतात.
निसर्गाच्या कुशीत असलेले हे देवदरी मंदिर बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्याच्या सीमेवर असून पर्यटन स्थळातही याची नोंद झाली आहे. हे तीर्थक्षेत्र तीन तालुक्यांच्या सीमेवर असल्यामुळे दुर्लक्षित आहे. मुख्य रस्ता नादंखेडा बाजूने असून भाविकांची याच बाजूने वर्दळ असते. परंतु, हा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे त्या रस्ताचा दुरस्ती व्हावी, त्यामुळे या निसर्गाच्या कुशीत दुर्लक्षित असलेल्या देवदरीचा विकास होऊन एक सुंदर असे पुरातन मंदिर येथील निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनस्थळ म्हणून नक्कीच पर्यटकांना आकर्षीत करून शकते.