जालना- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील कामगारांना जिल्हा प्रशासने घरी जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार व्यवस्था करण्यात आली असून जालना रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशकडे श्रमीक विशेष रेल्वे रविवारी सायंकाळी रवाना झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत रेल्वे रवाना झाली.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता रेल्वे उत्तर प्रदेशातील उन्नवच्या दिशेने गेली. बावीस डबे असलेल्या या रेल्वेमध्ये बाराशे प्रवासी बसविण्यात आले होते. साधारणता: 24 तासात ही रेल्वे उन्नवला पोहोचेल.
दरम्यान, प्रत्येक प्रवाशाचे 595 रुपयाचे तिकीट भाडे आहे. ही रक्कम केंद्र तसेच काही लोकवर्गणीतून जमा करण्यात आल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. या विशेष रेल्वेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील सर्व व्यवस्थापने बंद होती. रेल्वे स्थानक परिसरालाही छावणीचे स्वरुप आले होते.
चारही बाजूने रेल्वे स्थानक परिसराला पोलिसांनी वेढले होते. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या बसणे या कामगारांना जालना स्थानकापर्यंत सोडण्यात आले. विविध संस्थांच्या माध्यमातून प्रवाशांना अन्नाचे पाकिटे देण्यात आली. तत्पुर्वी या कामगारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसयांच्या संयुक्त विद्यमाने कडक बंदोबस्त ठेवला होता. लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी आणलेल्या सर्व वाहनांना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी निर्जंतुकीकरण केले.