बदनापूर (जालना) - तालुक्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक नागरिकांनी नोंदणी केली आहे. ३० एप्रिलपासून बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे. शासनाच्या या कारभारावर ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
१ मेपासून होणार होते 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण
१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, १ मे सकाळपासून बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झालेली नसल्याने लस घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मागील तीन दिवसापासून नागरिक लस घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात येत आहे. मात्र लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना परतावे लागत आहे. बदनापूर तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यामध्ये सोमठाणा, वाकुळनी, शेलगाव, दाभाडी या गावाचा समावेश असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात ९२ गावांचा समावेश आहे.
30 एप्रिलपासून लसीचा तुटवडा
बदनापूर तालुक्यात ३० एप्रिल पासून लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागत आहे. पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यापर्यंत घेणे आवश्यक आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने अनेक जण दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करत आहे.
'लस कधीपर्यंत उपलब्ध होणार याची माहिती नाही'
शासनाने ४५ व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरण सुरु केलेले आहे. १८ ते ४४ वयोगटातील युवकांना देखील १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु बदनापूर तालुक्यात मागील तीन दिवसापासून लस पुरवठा झालेला नसल्याने लसीकरण थांबले आहे, लस कधीपर्यंत उपलब्ध होणार हे सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश सोळूंखे यांनी दिली आहे.
हेही वाचा -ऑक्सिजनच्या तुटवड्याने दिल्लीमधील रुग्णांची दमछाक...न्यायालयाची केजरीवाल सरकारला नोटीस