जालना - जालन्यात शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घेतली गेली आहे. प्रशासनाने शाळांना दिलेल्या सूचनांचे पालन करत शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शाळेमध्ये येणाऱ्या शिक्षकांची कोरोना तपासणी करून घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत शाळा
पहिल्या दिवशी शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे तापमान तपासून आणि निर्जंतुकीकरण करून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी पालकांकडून शासनाच्या निर्देशाप्रमाणे पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र लिहून घेण्यात आले आहे. शहरातील संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयात पहिल्या दिवशी नववीच्या 50 आणि दहावीच्या 50 मुलींना बोलावले होते. मात्र दोन्ही वर्गातील मिळून केवळ वीस विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उद्या नववी आणि दहावीच्या प्रत्येकी पन्नास विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. यानुसार या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने वर्ग घेणे सुरू आहे.
पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागतही केले. मात्र विद्यार्थ्यांची अपेक्षित संख्या न आल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांनी व्यक्त केली आहे. तर विद्यार्थीनींनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा - शोकाकुल वातावरणात हुतात्मा जवान संग्राम पाटील अनंतात विलीन
हेही - कंगना आजही राहणार चौकशीसाठी गैरहजर; गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव