जालना - प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारिस पठाण, अशी वक्तव्ये करतात. त्यामुळे अशा वक्तव्याला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी भोकरदनचे आमदार तथा जालना भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला आहे. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी असून 100 कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात सुरू केलेल्या विविध विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सध्याचे महाविकास आघाडी सरकारने सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील 700 कोटींच्या कामांनाही या सरकारने स्थगिती दिली आहे, असा आरोप यावेळी दानवे यांनी केला आहे. त्यामुळे स्थगिती दिलेल्या या सर्व कामांचा जाब विचारण्यासाठी 25 फेब्रुवारीला भाजप वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, आदींची उपस्थिती होती.