जालना - रोहनवाडी येथील एका वाळू तस्कराला ताब्यात घेऊन एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. सचिन आप्पासाहेब चाळसे (वय 32), असे या तस्कराचे नाव असून त्याला औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठवण्यात आले.
30 जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेचे आदेश काढल्यानंतर चाळसे फरार झाला होता. सचिन चाळसे बीडवरून झाल्टा मार्गे औरंगाबादला येत असल्याची माहिती जालना तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सापळा रचून चाळसे याला ताब्यात घेतले.
29 फेब्रुवारीला सचिन चाळसे, गणेश महिंद ,गणेश कापसे, तुकाराम चावरे व अन्य काही आरोपींनी नायब तहसीलदारांच्या पथकावर हल्ला केला होता. रोहनवाडी शिवारातील नदीच्या पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू वाहतूक होत असताना नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या पथकाने तेथे छापा मारला होता. या पथकावर चाळसेसह इतर आरोपींनी दगडफेक करत पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सरकारी वाहन घेऊन हे सर्व आरोपी पळूनही गेले होते.
याप्रकरणी सचिन चाळसे याच्यावर कलम 307, 353, 332, यासह गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांची माहिती जमा करून तालुका पोलिसांनी पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांच्यामार्फत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सचिन चाळसे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 30 जूनला सचिनला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, रामेश्वर मुळक, अरुण मुंडे, सुनील गांगे ,अशोक राऊत यांचा चाळसेला पकडणाऱ्या पथकात सहभाग होता.