जालना - मंठा तालुक्यात मुख्य शाखा असलेल्या मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखांवर भारतीय रिझर्व बँकेने निर्बंध घातले आहेत. मंगळवारी 17 नोव्हेंबर पासून हे निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे खातेधराकांनी बँकेसमोर गर्दी केली आहे. बँकेवर लागू करण्यात आलेले हे निर्बंध म्हणजे भ्रष्टाचार किंवा अनागोंदी कारभार झाल्यामुळे नाही तर ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवी आणि ग्राहकांनी काढून घेतलेल्या ठेवी या व्यवहाराची जुळवाजुळव होत नसल्यामुळे लावण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
बँकेच्या चार शाखा
मंठा अर्बन को ऑ बँकेच्या एकूण चार शाखा आहेत. त्यामध्ये मंठा तालुक्यासह जालना तालुक्यातील सेवली, जालना शहर आणि चंदंनजिरा अशा अन्य तीन शाखा आणी एक मुख्य शाखा आहे. या बँकेच्या ठेवीच्या हिशोबामध्ये सध्या आकडेवारीत फेरफार दिसून येत आहे. त्याच्या चौकशी साठी बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
भ्रष्टाचार नाही-
भारतीय रिझर्व बँकेने 13 तारखेला जारी केलेल्या निर्बंधाच्या पत्रानुसार 17 नोव्हेंबर पासून अमंलबजावणी सुरू आहे. बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 1945 च्या कलम 35 नुसार लागू केलेले हे निर्बंध आहेत. त्यानुसार कर्ज वाटप करता येणार नाही. एक हजाराच्यावर व्यवहार करता येणार नाहीत, ग्राहक भांडवलाच्या स्वरूपात भांडवल जमा करू शकतात, ज्यांनी फिक्स डिपॉझिट ठेवलेले आहे. त्यांचे नूतनीकरण होईल, मात्र ती रक्कम काढता येणार नाही, तसेच ज्या ग्राहकांनी ठेव ठेवून कर्ज घेतलेले आहे, अशा ग्राहकांचे प्रकरण तडजोड अंती निकाली काढू शकतात. आज बँकेचे व्यवहार आणि ठेवी काढण्यासाठी बँकेसमोर ग्राहकांची गर्दी झालेली होती.
मुंबईतील लक्ष्मीविलास बँकेवरही निर्बंध-
रिझर्व्ह बँकेने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला सिंगापूरच्या डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 16 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असून बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे.