जालना - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मात्र भीती बाळगू नये असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते.
जालनामध्ये आतापर्यंत वाढले नाहीत, एवढे कोव्हिड-१९ ची बाधा झालेले रुग्ण वाढल्याची कबुली राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे बोलताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, टाळेबंदी लावणे हा कोरोनावरील पर्याय नाही. त्यामुळे ती शक्यता तूर्तास तरी नाही. परंतु कोव्हिडची लस देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनादेखील मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनावरील उपचारात कोरोनील वापरता येणार नाही- आयएमए
ग्रामीण भागातील जनतेने तालुक्याच्या ठिकाणी उपचार घ्यावेत
जिल्ह्यामध्ये मंठा, राजुर, भोकरदन, अंबड ,आदी ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असलेले बेड आहेत. मात्र अनेक जण भीतीपोटी जालन्यातील हॉस्पिटलमध्ये येत आहेत. येथे येऊन आवश्यकता नसतानाही ऑक्सिजनचा वापर करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी तालुका स्तरावरच उपचार केले पाहिजेत. केवळ भीतीपोटी येथे येऊन ऑक्सिजनचे बेड अडकवून ठेवू नयेत, असे आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले.
हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ
विलगीकरण महत्त्वाचे-
कोरनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याला कारण म्हणजे गर्दी हेच आहे. यामध्ये कोव्हिडची लक्षण असलेली अनेक नागरिक हे घरगुती उपचार करत आहेत. घरीच विलगीकरणात राहत आहेत. मात्र, यामुळे त्यांचे नुकसान होऊन पूर्ण घरच कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वतःहून आरोग्य विभागाने नेमून दिलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातच राहावे. जेणेकरून त्यांच्या परिवारालादेखील यापासून धोका होणार नाही. तसेच रुग्ण जर संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहण्यास तयार नसतील तर त्याचे समुपदेशन करून मन वळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. यावरही संबंधिताने नकार दिलाच तर मात्र जबरदस्तीने त्याला विलगीकरण कक्षात ठेवल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी माहितीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख ,सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक पद्मजा सराफ, माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.