जालना - आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची पद्धत चुकीची असून, नवी पद्धत वापरून उर्वरीत 50 टक्के जागा भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on Health Paper Exams ) यांनी दिली आहे. जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.
राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती. मात्र, मोठ्या मेहनतीने 50 टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला. त्यामुळे राहिलेल्या 50 टक्के जागा गडबड होणार नाही अशी परीक्षा पद्धत वापरून लवकरच भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आधीची परिक्षा पद्दत चुकीची
आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या वेळेस हा प्रकार घडला. मात्र, आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
आरोग्य विभाग पेपर फुटी
आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान हॉलतिकीट आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणानंतर मोठा गदारोळ माजला होता. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची ड गटाची परीक्षा असताना ड गटाचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच फुटला होता. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसांकडून मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज एका तरुणाला आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य भरतीतील परीक्षा ( Health Department Exam ) बाबत विधिमंडळात चर्चा झाली होती. पुनर्परीक्षेबाबत पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून, यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली.