बदनापूर (जालना) - जालन्याकडून औरंगाबादकडे बनावट क्रमांक पाटी लावून चोरीच्या स्वीफ्ट कारने जाणाऱ्या दोघा जणांना बदनापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमोल बाबूराव खोतकर (वय 28, रा. पडेगाव, ता. जि. औरंगाबाद) आणि शेख अयूब शेख कादर (वय 30, बायजीपुरा, गल्ली नं. 28, हमु नारेगाव) अशी दोघांची नावे आहेत.
वाहनांची पोलीस तपासणी सुरू असल्याचे पाहताच रस्त्यात कार उभी करून कारमधून उड्या मारून दोघेही पळून जाऊ लागले. पोलिसांचे पथक व काही स्थानिक नागरिकांनी या दोघांचा पाठलाग केला. दोघेही पळून जाऊन धोपटेश्वर रस्त्यावरील तुरीच्या शेतात लपण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. चौकशी केली असता त्यांनी आणलेल्या स्विफ्ट कारवर एमएच 20, डीजे 2747 असा क्रमांक टाकलेला होता. अधिक तपशील काढला असता सदरील क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले. इंजिन क्रमांक व चेसीस क्रमांकावर सदरील कारचा शोध घेतला असता या कारचा क्रमांक एमएच 15, एफएफ 4706 असा असून मूळ मालक राहुल सरोदे असे आहेत. सदरील कारबाबत अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद आहे.
दोन्ही आरोपींविरुध्द औरंगाबाद येथील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने यांच्याकडून चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात येऊन आरोपींची चौकशी केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, भिमाळे, फौजदार पूजा पाटील, नितीन ढिलपे, गजानन जारवाल, चरण बमनावत, चव्हाण, शिवाजी भगत, गृहरक्षक दलाचे रेकनोत, खोकड यांनी केली.