भोकरदन (जालना) - तालुक्यातील केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक कृष्णा मधुकर ठोंबरे (वय 21 वर्षे, रा. जवखेडा ठोंबरे, ता. भोकरदन) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून या ठिकाणी छापा मारला असता केदारखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून जवखेडा ठोंबरे गावाच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रॅक्टर जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला थांबवून झाडाझडती घेतली असता, त्यात वाळू आढळून आली. ट्रॅक्टर चालकास परवाना विचारला असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले.
7 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी 7 लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व 4 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा 7 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'अक्का काका' या नावावरून दरोडा उघडकीस, तिघांना ठोकल्या बेड्या
हेही वाचा - रांगेत उभा राहून जिल्हाधिकार्यांनी बजावला मतदानाचा हक्क