जालना - शहरात विविध ठिकाणी चोऱ्या करून मोटारसायकल पळवणार्या एका आरोपीला चंदनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन विविध कंपन्यांच्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
तीन मोटरसायकल जप्त -
फिर्यादी मनोहर पवार हे सत्यमनगर, येथे राहतात. त्यांच्या घरासमोरून 14 फेब्रुवारीला बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल चोरीला गेली. त्यासंदर्भात त्यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 23 फेब्रुवारीला विजय चौधरी यांनी देखील मोटारसायकल चोरीला गेल्याची एक तक्रार दिली. कन्हैयानगर येथे राहणाऱ्या संदीप क्षीरसागर यांची देखील एक बजाज कंपनीची विना नंबरची मोटरसायकल घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली. या तिन्ही तक्रारींच्या अनुषंगाने चंदनजिरा पोलीस तपास करत होते.
खबर्याने दिली माहिती -
या तीन्ही तक्रारींची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस नाईक साई पवार, अनिल काळे, विजय साळवे हे तपास करत होते. दरम्यान पेट्रोलिंग करत असताना अनिल काळे यांना या आरोपीची माहिती मिळाली. हा आरोपी राजुर चौफुलीकडून जालन्यात येत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी आरोपी अशोक भिकाजी तरकसे आला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली.
गाड्यांचे स्वीच बदलून घ्या -
जालना शहरात मागील सहा महिन्यांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहन मालकाने दर दोन वर्षांनी मोटर सायकलचे स्वीच बदलून घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.