जालना - अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे गेल्या 55 दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलक आज शरद पवारांना भेटण्यासाठी बारामतीला निघाले असता अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
55 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावात आंदोलन सुरू आहे. राज्यातील मराठा समाजाच्या विविध नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. न्यायालयाचा निर्णय अद्याप न आल्याने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलनकर्ते आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीकडे निघाले होते. परंतु अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली होती भेट -
मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा आमदार अशोक चव्हाण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, छत्रपती संभाजीराजे भोसले, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे आदींचा समावेश होता.
पोलीस बंदोबस्त तैनात -
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आंदोलनस्थळी दाखल झाले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास आंदोलक बारामतीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात आणले आहे. या आंदोलकांमध्ये मनोज जरांगे, संजय कटारे, शहादेव आवटे संपत शिंदे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती