जालना - महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सांस्कृतिक जडणघडण वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी शिवगान स्पर्धा उपयोगी ठरेल, असे मत उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केले.
भाजपा सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजन-
भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शुभांगी देशपांडे यांच्या पुढाकारातून आज शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आद्य नाट्यशास्त्रज्ञ भरतमुनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेलचे मराठवाडा संयोजक गजानन जोशी, तुळशेज चौधरी, सिद्धिविनायक मुळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषा पवार, संस्कृत विभागाच्या अध्यक्ष शुभांगी देशपांडे यांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक वारसा जपायला हवा-
सध्याच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानाची माहिती सर्वांना आहे. न्यूटन कोण आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र आपल्या संस्कृतीमधील महत्त्वाची माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नाही. अशा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना या संस्कृतीचा ठेवा कळतो. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत. एवढेच नव्हे तर आजच्या या कार्यक्रमातून एखादा विद्यार्थी आपले भविष्य देखील घडवू शकतो, असा आशावाद या कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केला.
दिवसभर चालला कार्यक्रम-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये दिवसभर सुरू होता. चिमुकल्यांच्या वेशभूषा, विविध पोवाडे, भारुड, सामूहिक नृत्य, अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे प्रदर्शन केले.
हेही वाचा- लाल किल्ला हिंसाचार : दीप सिधुला सात दिवसांची पोलीस कोठडी