जालना - जिल्ह्यात पाच जुलैपासून दहा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. आज संचारबंदीच्या शेवटच्या दिवशी 52 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान संचारबंदी मुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावाही केला जात आहे. मंगळवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नाही, त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे. मात्र, आज पुन्हा 52 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष बाब म्हणजे, या 52 पैकी 50 रुग्ण हे जालना शहरातील आहेत.
जालना शहरात निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये माणिक नगर 10, कन्हैया नगर 6, मंमादेवी नगर 4, समर्थ नगर 3, रामनगर 2, एसटी कॉलनी 2 रुग्णांचा समावेश आहेत. तर उर्वरित रुग्ण हे शकुंतला नगर, तेरापंथी नगर, नाथबाबा गल्ली, महावीर चौक, भाग्यनगर, बरवार गल्ली, आयोध्या नगर, भीम नगर येथील आहेत.
52 पैकी 2 रुग्ण हे भोकरदन तालुक्यातील धावडा आणि दुसरा जालना तालुक्यातील पीरकल्याण येथील आहे. दोन दिवसांच्या कालखंडानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. जालना जिल्ह्यातील आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 99 एवढी झाली आहे.
जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. संचारबंदी संपताच जिल्ह्यातील गावांमध्ये पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र म्हणून 238 शिक्षकांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.