जालना - राज्य शासनाने परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज पहिल्यांदाच परराज्यात जाणारे कामगार परतीच्या वाटेवर दिसले आहेत. त्यापैकी ओडिशा राज्यात जाणाऱ्या एका स्टील कंपनीतील 92 कामगारांना आज कंपनीच्या आवारातून वाहनाने पाठवले आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कामगारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातून प्रशासनाने वाहनाने बसून दिले आहे. दरम्यान औरंगाबाद येथून पाच वाजता मध्य प्रदेशला जाणारी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वेने जालन्यातून मध्य प्रदेशला जाणारे कामगार पुढे जाणार आहेत.
ऑनलाइन पासमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे परराज्यात राहणारे हे कामगार या त्रुटी दूर करता करता त्रस्त झाले आहेत. त्यामध्ये अनेक कामगार हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना हे ऑनलाईनचे काम करता येत नाही. शेवटी प्रशासनाने यांची प्राथमिक माहिती घेऊन आणि प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देऊन परवानगी देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार औरंगाबाद रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून औरंगाबादच्या रेल्वेस्थानकापर्यंत मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या माध्यमातून हे सर्व नागरिक औरंगाबादच्या रेल्वेस्थानकापर्यंत नेऊन सोडण्यात येणार आहेत.
आज दुपारी दोन वाजता 14 नागरिक असलेली पहिली बस औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथून रवाना झाली. मध्य प्रदेशमधील फक्त 26 जिल्ह्यांमधील लोकांनाच या राज्याने परत येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या याच जिल्ह्यातील लोकांना सोडण्यात येत आहे. या नागरिकांची कायदेशीर बाबी तपासून घेण्यासाठी नायब तहसीलदार तुषार निकम अव्वल कारकून अतुल केदार, तलाठी बाळकृष्ण कळकुंबे हे उपस्थित होते. दरम्यान सकाळी जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये चंदंनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सप्तशृंगी स्टील कंपनीतील 92 कामगारांना त्यांच्या ओरिसा राज्यात विशेष वाहनाने रवाना केले आहे. यावेळी कंपनीचे मालक कर्मचारी यांच्यासह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठावळे यांचीही उपस्थिती होती.