जालना - भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथे अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पारध पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस कर्मचारी सुरेश डुकरे, सुरेश पडोळ व पिंपळगाव रेणुकाईचे पोलीस पाटील गणेश निकम यांना जळकी तालुका सिल्लोड येथील भिल्ल समाजाच्या जमावाने हल्ला करून बेदम मारहाण केली आहे.
11 एप्रिल रोजी पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांना हिसोडा शिवारात अवैध दारूच्या भट्ट्या असून त्या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे सपोनि शंकर शिंदे, पोलिस कर्मचारी सुरेश डुकरे, सुरेश पडोळ व पंच म्हणून गेलेले पिंपळगाव रेणुकाई येथील पोलीस पाटील गणेश निकम हे सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान हिसोडा व सिल्लोड तालुक्यातील जळकी या गावाच्या शिवेवर आमराई नावाच्या शेत शिवारात पोहचले.
पोलिसांनी अवैध दारूचा शोध सुरू केला तेव्हा त्या ठिकाणी गावरान दारूचे 20 लिटरचे दोन कॅन सापडल्या. मात्र, दारू भट्टीवाले पळून गेले मात्र त्या ठिकाणी नकीम तडवी याला पोलिसांनी पकडले व पोलिसी खाक्या दाखवून अवैध दारूची माहिती मागितली. तडवी याने मात्र माझा या दारूशी काही संबंध नाही, असे पोलिसांना सांगितले. मात्र, तुझ्या शेतात दारूचे कॅन कशी काय असे म्हणून विचारत पोलिसी खाक्या दाखवला. यानंतर तडवी याने जळकी गावात फोन करून मला पोलीस मारहाण करीत आहे मदतीसाठी लवकर या असे सांगितले. त्या नंतर 100 ते 150 जणांचा जमाव हातात काठ्या लाठ्या घेऊन घटनास्थळी आला त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार अर्धा तास सुरू होता.