जालना - माझे वडीलही राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ होते आणि मीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रसारमाध्यमांवर येणाऱ्या बातम्या कशामुळे आल्या मला माहित नाही. मात्र, आलेल्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. एवढेच मी सांगू शकतो. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या अफवा आणि चर्चा शनिवारपासून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ई टीव्हीच्या प्रतिनिधीने केला.
कुठे तरी सहजपणे बोलताना विरोधी पक्षात सक्षम आणि चांगले नेते असायला हवेत, असे मी म्हणालो होतो. कदाचित त्याचाच गैर अर्थ काढला असावा, असे मला वाटते. मात्र, आपण कुठेही जाणार नाही. असे सांगत आमदार टोपे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.