जालना - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सगळे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बदनापूर शहरातील गोर गरीब, हातावर कमवून खाणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गरजू नागरिकांना आमदार नारायण कुचे यांनी अन्न धान्याचे वाटप केले. या बरोबरच बदनापूर तालुक्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी पीपीई (वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे) किट खरेदीसाठी 10 लाखांचा निधी मंजूर केला.
देशातील कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या आपत्तीत लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मदत करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत आमदार नारायण कुचे यांनी गरजू नागरिकांना मदत केली. गरजू नागरिकांना पाच किलो गहू आणि दोन किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले. स्वच्छता ठेवा, घराबाहेर पडू नका, आरोग्याची काळजी घ्या, अस्वस्थ वाटल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करा, काही अडचणी असल्यास फोन करून कळवा, असे आवाहन कुचे यांनी नागरिकांना केले.
कुचे यांनी एका महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा कोशमध्ये जमा केले. बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघातील खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार असून त्यांच्या पीपीई किटसाठी आमदार स्थानिक निधीमधून दहा लाख रुपये देण्यात आले.