जालना - लोधी मोहल्ल्यात काल (सोमवारी) रात्री दोन गटात झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारच्या वतीने कलीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी ही सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धीरज राजू राजपूत आणि समीर जाफर यांच्यामध्ये जुन्या भांडणाच्या वादावरून ही दगडफेक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना दर्गा वेस भागात राहणाऱ्या डॉक्टर धानूरे यांनी फोन केला आणि दोन गटात दगडफेक होत असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन घटनास्थळावर पोहोचलो तेव्हा प्रचंड दगडफेक सुरू होती. आम्ही स्पीकर वरून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या हातात काठ्या, दगड, तलवारी होत्या. संतप्त जमाव पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने येत होता. त्यामुळे स्वतःच्या आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी शासकीय पिस्तुलामधून एक गोळी झाडली आणि गोळीचा आवाज ऐकून जमाव पांगला. दरम्यान, पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अतिरिक्त पोलीस कुमक आल्याने इतरही दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सुमारे 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.