जालना - नगरपालिका हद्दीमध्ये पाच जुलैपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन केले होते. याची मुदत १५ जुलैला संपणार होती. मात्र, प्रशासनाने या लॉकडाऊन पुन्हा पाच दिवसांची वाढ करून २० तारखेपर्यंत वाढविण्यात आले. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, नोडल ऑफिसर संतोष कडले यांची उपस्थिती होती.
जालन्यात 20 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती वाढत्या लॉकडाऊनमध्ये यापूर्वीचे सर्व नियम आणि आदेश लागू राहणार आहेत. तसेच मंगळवारी परमीटरूम सुरू करण्याचे काढलेले आदेश लॉकडाऊन वाढल्यामुळे रद्द होणार आहेत. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यासाठी कादराबाद पाणीवेस परिसरात असलेल्या जालना नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक साधा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी शहरातील अकरा रुग्णालयामध्ये 80 टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कोणत्याही डॉक्टरला खासगी रुग्णालयामध्ये सेवा देण्यास बंदी घातली आहे. तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील अशा डॉक्टरांची सेवा घेऊ नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. मात्र, या योजनेत जे औषधे बसत नाहीत ती औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णाला पदरमोड करावा लागणार असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
शहरातील घरोघरी जाऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या नोंदी घेतल्या आहेत. 60 वर्षांवरील रुग्णांनी त्यांची तपासणी करून घेण्यासाठी जालना शहरातील पाणीवेस येथे असलेल्या नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. दरम्यान जालन्यात कोविड रुग्णालय उभे करण्यासाठी आणि आरोग्यविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी ज्या संस्थांनी मदत केली आहे, त्याचा हिशोब जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सादर केला.