जालना - लॉकडाऊन काळात बुडालेले उत्पन्न भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरसावले आहे. एसटी बसेसमधून मालवाहतूक करण्याचा पर्याय यासाठी निवडण्यात आल आहे. जालना विभागातील 21 बस गाड्यांचे रूपांतर मालवाहतुकीच्या ट्रकमध्ये करण्यात आले आहे. यामधून उत्पन्न भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या 4 महिन्यांमध्ये जालना विभागाला या मालवाहतुकीमधून 21 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर सर्वच व्यवसाय, उद्योग बंद झाले याला एसटी देखील अपवाद नव्हती. शासनाने वाहतुकीवर बंदी आणल्यानंतर एसटी महामंडळाने ही बसेस बंद केल्या. मात्र, आता आंतरजिल्हा बसेस आणि थोड्या प्रमाणात बसेस सुरू झाल्या असल्या तरीही पाहिजे तेवढा प्रतिसाद प्रवाशांचा मिळत नाही. गेल्या चार महिन्यांपासून आस्थापना विभागात काम करणारे कर्मचारी वगळता वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचारी यांना फारसे काम नव्हते.
हेही वाचा-जालन्यातील 39 स्पर्धा परीक्षा केंद्र चालकांसमोर कर्जाचे हप्ते फेडण्याचे संकट
लॉकडाऊनमुळे बुडालेले उत्पन्न भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने जुन्या बस गाड्यांचे रूपांतर मालवाहू ट्रक मध्ये केले आहे. बाहेरील सांगाडा आणि खिडक्या तसाच ठेवून आत मधील आसन व्यवस्थ काढली आहे. त्यामुळे या बसेस मालवाहतुकीसाठी सुरक्षित आहेत. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हे काम सुरू आहे. लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी दोन चालक असतात. मालवाहतुकीचा व्यवसाय मिळविण्यासाठी एसटीने विभागांतर्गत टीम तयार केली आहे. विभाग नियंत्रकांपासून ते आगार प्रमुखापर्यंत सर्वजण विविध संस्थांना, उद्योजकांना, दुकानदारांना भेटी देऊन व्यवसाय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांच्या प्रयत्नामुळे अल्पावधीतच 21 लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे.
मालवाहतुकीची क्षमता आणि दर
एसटीने बनवलेल्या मालवाहतूक ट्रकमधून दहा टन मालवाहतूक करता येईल. या मालवाहू ट्रकमध्ये आतील बाजूस 25 फूट लांब, आठ फूट रुंद, आणि साडेसहा फूट उंच अशी जागा वापरायला मिळते. या वाहनाचे कमीत कमी भाडे साडेतीन हजार रुपये आहे (हे मात्र ते 90 किलोमीटरच्या आत मध्ये असले पाहिजे) त्यापुढील भाड्यासाठी वेगळा दर आहे. जुन्या बसमधून मालवाहू ट्रकमध्ये रूपांतर करण्यासाठी जास्त क्षमतेच्या नवीन स्प्रिंग बसवल्या गेल्या आहेत. टायरची क्षमताही वाढवण्यात आली आहे, त्यासोबत बसच्या वरून मजबूत पत्राही लावण्यात आला आहे.
प्रमोद नेहुल (विभाग नियंत्रक ),सचिन पवार (समन्वयक),दीपक लांडगे (यंत्र अभियंता),पी .डी चव्हाण ( जालना आगार प्रमुख),एस. एस. टकले (अंबड आगार प्रमुख),डी.एम .जाधव (परतूर आगारप्रमुख ),सी. व्ही. लोखंडे (जाफराबाद आगार प्रमुख),एस .के पवार (भांडार अधिकारी)नितीन खरात (भांडारपाल )उद्धव खांडेभराड (सहाय्यक कार्यशाळाअधीक्षक) यांची टीम बसेसचे मालवाहतूक ट्रकमध्ये रुपांतर करण्यासाठी कार्यरत आहे.
औरंगाबाद विभागातील वाहतुकीचे ट्रक
जालना 21, औरंगाबाद 27 ,बीड 20, लातूर 13, परभणी 14 ,नांदेड 11 ,उस्मानाबाद 20