जालना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय वर्ष प्रशिक्षण शिबिराला रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर या तिन्ही मंत्र्यांनी हजेरी लावत आम्ही एक 'संघ' आहोत, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर जालन्यात दुपारी अडीच वाजता आलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांनी घरी जाण्यापूर्वी संघाच्या शिबिरात हजेरी लावली.
याचबरोबर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही हजेरी लावली होती. खासदार दानवे आणि नामदार लोणीकर यांचा 'संघ' परिवाराशी जवळचा संबंध तसेच, भाजपचे मंत्री असल्यामुळेही हे दोघे अप्रत्यक्षपणे संघाचे कार्यकर्ते समजले जातात.
मात्र त्यांच्या संगतीला आता राज्यमंत्री अर्जुन खोतकरदेखील संघाच्या समारंभांना हजेरी लावत आहेत. मागील वर्षी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनालाही अर्जुन खोतकर यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या तीनही मंत्र्यांसाठी संघाच्या शिस्तीनुसार कोणतीही खास व्यवस्था नव्हती.