जालना - नगरपालिकेच्या वतीने मंठा चौफुलीवर झालेली अतिक्रमणे आज(शुक्रवार) हटवण्यात आली. या प्रमुख मार्गावर झालेले अतिक्रमण, वाहनधारकांना होणारा त्रास आणि त्यामधून नगरपालिकेच्या नावाने होणारी ओरड या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी जालना नगरपालिकेच्या वतीने ही अतिक्रमणे हटवण्यात आली.
शहरातील प्रमुख महामार्ग मंठा चौफुलीला जोडले गेले आहेत. त्यासोबत बायपास रोडवरील एक महत्त्वाचा रस्ता म्हणून या चौफुलीचा वापर होतो. या ठिकाणी आंबेकर रुग्णालय, जालना क्रिटिकल केअर, संतकृपा, मातृछाया अशी मोठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन हॉटेल चालक, रसवंतीगृह, रिचार्ज सेंटर, चिकन सेंटर अशी अनेक दुकाने रस्त्यातच थाटली गेली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या मदतीने हा सर्व कारभार सुरळीतपणे सुरू होता.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची विशेष मोहीम
नगरपालिकेच्या नावाने ओरड लागल्याने पालिकेने अखेर या अतिक्रमाणावर जेसीबी चालवला आहे. यावेळी मात्र स्वच्छता निरीक्षकांनीच ही सर्व अतिक्रमणे हटवण्यास पुढाकार घेतला. येथील अतिक्रमणे पत्र्याच्या शेडमध्ये आणि कच्ची असल्यामुळे कसल्याही प्रकारचा गाजावाजा न होता नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीनेच ही अतिक्रमणे काढली गेली.
हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क