जालना - घरावर लावलेल्या झेंड्याच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना शहरातील नूतन वसाहत परिसरात घडली. यामध्ये या प्रकरणात मध्यस्थी करणार्या वकीलालासुद्धा जबर मार लागला आहे.
नूतन वसाहत भागातील वाळकेश्वर मंदिरासमोर पंढरीनाथ नाईक यांचे घर आहे. त्यांच्या घरावर शेजारी राहणाऱ्या बनसोडे परिवाराने झेंडा लावला आहे. या झेंड्यावरून दोन्ही परिवारात वाद चालू होते. पंढरीनाथ नाईक यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी कदीम जालना पोलिसांनी बनसोडे आणि नाईक यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. वकील बबन मगरे देखील तिथे उपस्थित होते. यावेळी, शाब्दिक वाद वाढल्याने परिवारांतील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
याप्रकरणी, दोन्ही परिवारांनी एकमेकांविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बबन मगरे हे सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. नाईक यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तर, सागर बनसोडे हा गंभीर जखमी झाला आहे. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही