जालना - 1972मध्ये आणीबाणीच्या काळात कारागृहाची शिक्षा भोगलेल्या सत्याग्रहींचे मानधन महाविकास आघाडी सरकारने जुलै महिन्यापासून बंद केले आहे. त्यामुळे हयात असलेल्या सत्याग्रहींवर वृद्धापकाळात संकट ओढावले आहे. जालन्यातील ५७ सत्याग्रहींसह महाराष्ट्रातील 3 हजार 645 सत्याग्रही या लाभापासून वंचित आहेत.
आणीबाणीच्या काळात सत्याग्रहाला सामोरे जाणाऱ्या सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला होता. याचा सन्मान म्हणून भाजपा सरकारने जानेवारी 2018मध्ये राज्यातील 3 हजार 645 सत्याग्रहींना भोगलेल्या शिक्षेच्या कालावधीनुसार मानधन सुरू केले होते. हे मानधन 23 जुलै 2020ला झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आले. यावर 31 जुलै रोजी राज्यपालांनी शिक्कामोर्तबही केले आहे. हे मानधन बंद करताना सरकारने असे सांगितले, की जुलै महिन्यापर्यंतचे सर्व मानधन संबंधितांना दिले जाईल. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून या सत्याग्रहींच्या खात्यावर एक दमडीही पडलेली नाही. या सर्व सत्याग्रहींनी सध्या वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी का होईना या मानधनाची मदत होत होती ती. सोबत त्यांचा खर्च वरच्यावर निघत असल्यामुळे नातेवाईकदेखील त्यांची आस्थेने विचारपूस करत होते. मात्र, मानधन बंद करण्यात आल्यामुळे सत्याग्रहींमध्ये तीव्र नाराजी आहे.
काही सत्याग्रहींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात खटला भरला आहे. न्यायालयाने हे मानधन आहे की सेवा निवृत्तीवेतन यासंदर्भात विचारणा केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी हे मानधन आहे असे सांगितले. शासन असे मानधन केव्हाही बंद करू शकते असा निर्वाळा न्यायालयाने दिला. मात्र, अशाच प्रकारचे मानधन गोवा मुक्ती संग्रामात कारावास भोगलेल्या लोकांना सुरू आहे, अशी पुष्टी याचिकाकर्त्यांनी केल्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, हा निर्णय जर सत्याग्रहींच्या विरोधात गेला तर आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, अशी माहिती सत्याग्रही व लोकतंत्र सेनानी संघाचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दिगंबर दीक्षित यांनी दिली.
जालन्यातील सत्याग्रहींची संख्या आणि त्यांना मिळणारे मानधन
जालना - 3, भोकरदन - 17, जाफराबाद - 14, परतुर - 4, अंबड - 18, घनसावंगी - 1, एकूण - 57
प्रति महिना दहा हजार रुपये मानधन घेणाऱ्यांची संख्या-
भोकरदन 1, जाफराबाद 1, परतूर 1, अंबड 3, घनसावंगी 1.
प्रति महिना पाच हजार रुपये मानधन घेणाऱ्यांची संख्या -
जालना - 3, भोकरदन - 13, जाफराबाद - 9, परतुर - 3, अंबड - 12,
प्रति महिना अडीच हजार रुपये मानधन घेणाऱ्यांची संख्या -
भोकरदन -3, जाफराबाद-4, अंबड -3,