बदनापूर (जालना) - पालकमंत्री राजेश टोपे हे बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सायंकाळी उशिरा आल्याने भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी "रात्री नको दिवसा उजेडात या, पालकमंत्री चले जाव" असा घोषणाबाजी केली. दरम्यान, या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री टोपे यांनी नुकसानीची पहाणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करा असे आदेश दिले. मंत्रालयातून तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच सर्व उर्वरित नुकसानीचे ही तात्काळ पंचनामे करा, त्याचे चावडी वाचन करून वस्तुनिष्ठ नुकसान नोंदवा, असे आदेश दिले आहेत.
बदनापूर तालुक्यातील रोषणगाव सर्कलमधील गावात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले होते. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे या नुकसानीची पाहणी करणार होते. मात्र पालकमंत्र्याना जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस उशीर झाल्यामुळे व त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने जिल्ह्याधिकारी कार्यलयातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथेच पालकमंत्री टोपे यांना उशीर झाला. यामुळे त्यांना बदनापूर पाहणी दौऱ्यासाठी उशिरा आले.
सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पालकमंत्री टोपे यांचे आगमन होताच, तिथे उपस्थित असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून, पालकमंत्री दिवसा या अशी मागणी केली. मात्र पालकमंत्री टोपे यांनी सर्वांची भेट घेऊन संवाद साधून शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे सांगून धोपटेश्वर व अंबडगाव येथील शेतीची पाहणी केली.
यावेळी एसडीएम सानप, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी ठक्के यांना पालकमंत्री टोपे यांनी थेट सूचना देऊन या भागातील झालेले सर्व पंचनामे तात्काळ सादर करावे, असे सांगून हे पंचनामे सादर करताच, मी मुंबईतून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देतो, असे सांगून ज्या शेतकऱ्यांचे विहिरी वा तत्सम नुकसान झालेले आहे, त्यांचे ही वस्तुनिष्ठ पंचनामे करा, त्या पंचनाम्याचे चावडी वाचन करा, असे आदेश दिले.
या वेळी शेतकरी व आमदार नारायण कुचे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत घ्यावी व विमाचे निकष बदलून शेतकऱ्यांना द्राक्षे, मोसंबी व इतर फळबागासह सर्व विमा मंजूर करावा, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री टोपे यांनी, याबाबत ही सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी आमदार कुचे, बबलू चौधरी, बाळासाहेब वाकुळणीकर, गजानन गीते, पांडुरंग जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, गणेश कोल्हे, नंदकिशोर शेळके आदीसह शेतकरी उपस्थित होते.